Baramati News l हरवलेली विशेष मुलगी नऊ वर्षांनी पालकांच्या कुशीत : सुपे येथील प्राजक्ता शाळेमुळे संपर्क...नऊ वर्षे कर्नाटकच्या संस्थेने सांभाळले

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव 
अहिल्यानगर येथून गाणगापूर येथे दर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील विशेष मुलगी (मतिमंद) हरवते अन कर्नाटक मधून तब्बल नऊ वर्षानी पुन्हा पालकांच्या कुशीत येते. यात सुपे ( ता.बारामती ) येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात यश आहे. 
          कर्नाटक सरकारच्या कलबुर्गी येथील एम.आर. गर्ल्स होम मध्ये ही विशेष मुलगी नऊ वर्ष होती. तिचा चांगला सांभाळ या संस्थेने केला. पालकांचा शोध घेण्यात नऊ वर्ष गेली. अथक प्रयत्नातून आधार कार्ड मिळाले. आणि विशेष मुलीला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला. 
            सुपे येथील प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमित्रा (नाव बदलले आहे) ही विशेष मुलगी शिकत होती. त्यावेळी तिचे आधार कार्ड शाळेने काढले होते. पालकांनी सन २०१६ मध्ये मुलीला घरी नेले. घरी गेल्यानंतर काही दिवसांनी ही मुलगी हरवली. ती थेट कर्नाटक मध्ये पोचली. तेथील संस्थेने तीचा चांगला सांभाळ केला.  
             आधार कार्ड शोधण्याचा प्रयत्न केला.  अथक प्रयत्नानंतर तिचे आधार कार्ड मिळाले. त्यावर प्राजक्ता शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर यांना फोन क्रमांक होता. त्यामुळे पालकांपर्यंत ही मुलगी पोहोचण्यास मदत झाली.          
              २०१६ मध्ये या विशेष मुलीचे आधार कार्ड काढताना बऱ्याच अडचणी आल्या. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये प्रयत्न केला. तरीही आधार कार्ड आले नाही. त्यानंतर त्यांनी आधार कार्डचे मुख्यालय बेंगलोर येथे जाऊन चौकशी केली असता आधार नोंदणीवर प्राजक्ता  शाळेचा पत्ता व मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला. त्यानंतर शाळेकडून पालकांना माहिती देण्यात आली. सुपे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुपेकर यांनी समन्वय साधून सर्वांना शाळेत बोलावले. 
         सोमवारी ( दि.८ ) दुपारच्या दरम्यान सुपे (ता. बारामती) येथील प्राजक्ता मतीमंद निवासी विद्यालयात एम. आर. गर्ल्स होम, कलबुर्गी यांच्याकडून समुपदेशक सुमंगला एस. कोरे, काळजी वाहक संगीता, कर्नाटक सरकार चाईल्ड लाईन विभागाचे प्रतिनिधी सुंदरराज चंदनकेरा हे सुमित्राला घेऊन आले.
           तब्बल नऊ वर्षांनी तिचे पालक भेटणार होते. दरम्यान, सुमित्राचे वडील आणि एक नातेवाईक शाळेत आले. सुमित्राला उपस्थितांसमोर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पालकांनी व जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाने कर्नाटकहून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करून आभार मानले. याप्रसंगी विठ्ठल ठोकळ, संजय धारकर, मुख्याध्यापिका शुभांगी सुपेकर आदींसह शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.
-------------------------------------------
To Top