Satara Breaking l खंडाळा तालुक्यातून सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी तडीपार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी 
खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरामध्ये सातत्याने विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. 
यामध्ये, टोळीप्रमुख प्रकाश अशोक जाधव याच्यासह मयूर अशोक जाधव, विशाल महादेव जाधव, सोन्या उर्फ विकास संजय पवार (सर्व रा.शिरवळ, ता. खंडाळा), किरपालसिंग शीतलसिंग दुधानी (रा. लोणावळा, ता. मावळ) व सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव (रा.वीर, ता.पुरंदर) या सहा जणांवर ही तडीपार कारवाई करण्यात आली आहे. 
या टोळीवर दरोडा टाकने, जबरी चोरी करणे, दंगा मारामारी करून विनयभंग करणे, इच्छापूर्वक दुखापत पोचवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यामुळे शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी या टोळीविरुद्ध त्यांना पुणे व सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे दिला होता. या प्रस्तावाची चौकशी फलटणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. भालचिम यांनी केली. 
यामध्ये टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर धाक दाखवून वराह चोरी करणे, दरोडा टाकने, महिलांचा विनयभंग करणे, गर्दीत मारामारी करून दुखापत पोहोचवणे असे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नसल्याने व या टोळीचा उपद्रव वाढल्याने खंडाळा तालुक्यातील लोकांना याचा प्रचंड त्रास होता. यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत होती अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर या टोळीला तडीपार करण्यात आले. 
        सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी काळात सातारा जिल्ह्यातील अशा शाळात गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एम पी डी ए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
To Top