Baramati News l आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादन वाढणार : पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बु : प्रमोद पानसरे
पुढील काळात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य आहे. पैशाची बचत करण्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे असून, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन प्रयोग केले, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल असे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले.    
          थोपटेवाडी येथील शेतकरी योगेश जगन्नाथ थोपटे यांच्या ऊसशेतावर “हुमणी किड नियंत्रण, एआय तंत्रज्ञान व ऊस पीक व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी माजी संचालक शेखर खंडागळे, माजी सभापती प्रदीप धापटे, विक्रमी १३८ टन ऊस उत्पादन घेणारे संजय जगताप, के. बी. कोकरे, सुनील गायकवाड, अजित गायकवाड, सूर्यकांत थोपटे, नानासाहेब माळशिकारे, नारायण नलावडे, राजेश वाघ, अमर थोपटे, सचिन थोपटे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच थोपटेवाडी व कोर्‍हाळे बुद्रुक पंचक्रोशीतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.            कार्यक्रमात कारखान्याचे ऊस विकास अधिकारी निंबाळकर यांनी हुमणी किड नियंत्रणाविषयी सविस्तर माहिती दिली. माती परीक्षण विभाग प्रमुख के. के. पाटील यांनी AI तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींवर मार्गदर्शन केले. शेतकरी योगेश थोपटे यांनी सांगितले की, ऊस शेतीला भेट देऊन अधिकारी आमच्या अडचणी जाणून घेतात व मार्गदर्शन करतात, त्यामुळे आमचा आत्मविश्वास अधिकच वाढतो. कारखान्याने घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 
To Top