भोर आगारातून अनेक वर्षे सुरू असलेली भोर-पंढरपूर एसटीची फेरी कोरोनाच्या काळात बंद करण्यात आली. त्यानंतर अद्याप ती पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना, भाविकांना तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखिल वारकरी संघ, भोर यांच्या वतीने आगार व्यवस्थापक रमेश मंता यांना निवेदन देऊन ही एसटी पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भोर-पंढरपूर एसटी दररोज सकाळी पावणे आठ वाजता भोर आगारातून सुटत असे आणि पुन्हा रात्री आठ वाजता भोरला पोहोचत असे. या सोयीमुळे भाविक भक्तांना एकादशीसह इतर वारकऱ्यांच्या वारींना पंढरपूरला जाणे सहज शक्य होत असे. मात्र, एसटी सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना खासगी व अवैद्य वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढला आहे तसेच सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.
वारकरी संप्रदायाचे भोर तालुक्यात मोठे प्रमाण असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी ही बस सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. भोर-पंढरपूर एसटीमुळे महामंडळाला तोटा होत नसतानाही ती फेरी बंद ठेवली गेली आहे, हे भाविकांसाठी अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर राज्य वारकरी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र महाराज घाणेकर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गिरे, सचिव जितेंद्र बांदल, सल्लागार पंढरीनाथ भिलारे, कार्याध्यक्ष सतीश वाल्हेकर, राहुल महाराज पारठे, शंकर कुंभार, ज्ञानेश्वर धोंडे, दिलीप चंदनशिव, पंढरीनाथ कोंढाळकर, संजय भिलारे आदींची स्वाक्षरी असून, तातडीने एसटी पूर्ववत न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
👉 वारकरी बांधवांकडून आता “भोर-पंढरपूर एसटी पुन्हा सुरू करा” ही मागणी अधिकाधिक जोर धरू लागली आहे.
