सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील मांढरदेवी मार्गावरील बालवडी-आंबाडे परिसरात मागील महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा उच्छाद वाढला असून शेतकऱ्यांच्या खरिपातील कडधान्य, भात, घेवडा, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यासमोर वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
पूर्वी वन्यप्राणी डोंगर व जंगलाशेजारील शेतांमध्येच नुकसान करत होते. मात्र आता रानडुकरांचे कळप व वानर थेट घराशेजारी येऊन पिके उध्वस्त करत आहेत. नेरे, गोकवडी, आंबाडे, निळकंठ, पाले, वरवडी या गावांतील शेतकरी या परिस्थितीमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत.
वानरांचे कळप अन्न-पाण्याच्या शोधात घरांवर उड्या मारून घरांची कौले फोडत आहेत. इतकेच नव्हे तर वानरे लोकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. एका रात्रीत तब्बल २५ ते ३० रानडुकरांच्या कळपाने दहा किलो पेरणी केलेल्या भुईमुगाचे संपूर्ण नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.
काही वेळा वानरे थेट घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने वयोवृद्ध नागरिक चिंतेत आहेत. वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी तसेच तातडीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बालवडी येथील शेतकरी बापू निकम यांच्यासह शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.