Mahabaleshwar Breaking l दुचाकीवर माकडाची झडप..! पती ठार, पत्नी गंभीर जखमी : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
महाबळेश्वर : सचिन भिलारे
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी दुचाकीवर माकड झडप घालून बसल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, आनंद सखाराम जाधव (वय ५०, रा. देवळी, ता. महाबळेश्वर) हे पत्नीसमवेत महाबळेश्वरहून देवळीकडे दुचाकीवरून जात होते. दरम्यान, चिखली परिसरातील तापोळा रस्त्यावर अचानक रस्त्याच्या कडेला बसलेल्या माकडाने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. ही घटना इतकी अचानक घडली की आनंद जाधव यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरून अपघात झाला.

या अपघातात पती-पत्नी दोघेही रस्त्यावर कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आनंद जाधव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे देवळी गावात शोककळा पसरली आहे. आनंद जाधव हे कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
         महाबळेश्वर परिसरात गेल्या काही वर्षांत माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर झडप घालणे, अन्न हिसकावून नेणे अशा घटना वारंवार घडत असून नागरिक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
To Top