सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
पुरंदर तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पुन्हा स्वगृही परतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पक्षातील कार्यपद्धती व बदललेले राजकीय समीकरण पाहता त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवला आहे.
कामठे यांचा प्रवेशाच्या चर्चेमुळे पुरंदर तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपला यामुळे मोठा धक्का बसणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये बळ मिळणार, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कामठे हे पुरंदर तालुक्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक सामाजिक, शैक्षणिक व विकासकामे राबवली आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र आता त्यांच्या पुनर्प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्साहात आले आहेत.
कामठे यांनी पक्षप्रवेश घेणेच्या निर्णयावर बोलताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते मला पुन्हा स्वगृही घेऊन आले. आता पक्ष मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.” राजकीय विश्लेषणानुसार कामठेंचा पुनर्प्रवेश हा आगामी स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असून जिल्ह्यातील सत्तासमीकरणात मोठा बदल घडवू शकतो.