Rajgad l राजगड तालुक्यात दुर्मीळ चौसिंगा हरणांचे आगमन..! गोठ्यात शिरलेल्या दोन पाडसांना वन विभागाकडून जीवदान

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

राजगड : मिनल कांबळे
तोरणा किल्ल्यांच्या दऱ्या-खोऱ्यातील हिरव्यागार जंगलात दुर्मीळ चौसिंगा जातीच्या हरणांचे वास्तव्य असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले आहे. शनिवारी (दि. २७) संध्याकाळी वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील कैलास बोराणे यांच्या गायी-वासरांसोबत थेट गोठ्यात आलेल्या दोन पाडसांमुळे हा दुर्मिळ प्रकार समोर आला.

स्थानिक ग्रामस्थ किशोर कोळपे, प्रसाद सांगळे, मंगेश पवार, सचिन गायखे, रामभाऊ राजिवडे आणि विनोद दिघे यांनी पाडसांच्या आईचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. सुमारे दीड ते दोन महिन्यांची पाडसे पावसात व थंडीत गारठलेली असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे व स्थानिक वनरक्षक भाग्यश्री जगताप यांनी पुढाकार घेत पाडसांची काळजी घेतली. रात्री उशिरा त्यांना सुरक्षितपणे बावधन येथील प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.

अनिल लांडगे यांनी सांगितले, “राजगड-तोरणा परिसरासह पानशेत व रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर चौसिंगा जातीचे हरिण दुर्मीळ आहेत. या पाडसांच्या आढळण्यानंतर येथे प्रथमच या जातीचे वास्तव्य सिद्ध झाले असून, अधिवास सुरक्षित करण्यासाठी वन विभाग विशेष मोहीम राबवणार आहे.”

To Top