सोमेश्वर रिपोर्टर न्युज
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयात पार पडलेल्या पुणे विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत (वाघळवाडी -आप्पासाहेबनगर ता. बारामती) येथील पै. दामिनी दिगंबर शिंदे हिने ६५ किलो वजनी गटात उत्कृष्ट खेळ करून सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय यशामुळे तिची हरियाणा येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पै. दामिनी शिंदे ही अहिल्यानगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई सेंटर) येथे गेली सहा वर्षांपासून कठोर सराव करत आहे. तिच्या कुस्ती कारकिर्दीत तिला वस्ताद पै. तानाजी नरके, पै. अवधूत कोरडे तसेच एकता तालीम कुस्ती केंद्राचे वस्ताद प्रशांत गायकवाड व संग्राम डोंबाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सुवर्णयशाबद्दल उद्योजक दीपक साखरे, सनी शेलार आणि क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दामिनीचे अभिनंदन करून तिला पुढील राष्ट्रीय पातळीवरील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पै. दामिनी शिंदे ही अतिशय गरीब कुटुंबातील कन्या असून तिचे आई-वडील वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात. येत्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला आवश्यक आर्थिक सहाय्याची गरज असून, तिच्या वडिलांनी समाजातील दातृत्वशील नागरिकांनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.