राजगड ब्रेकिंग l राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला : तोल जाऊन २४ वर्षीय तरुणी ४० फूट खोल दरीत पडली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे
पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण राजगड किल्ल्यावर गंभीर अपघात घडला. किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय २४ वर्षे) या युवतीवर अचानक मधमाश्यांचा हल्ला झाला. घाबरल्यामुळे तोल जाऊन सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली.

या घटनेत युवतीच्या मानक्यामध्ये (पाठीच्या कण्यामध्ये) फ्रॅक्चर झाल्यामुळे ती स्वतः हालचाल करू शकत नव्हती. तातडीने तिच्या बचावासाठी माहिती वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचवण्यात आली. माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार व अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून रेस्क्यू चालवणे आवश्यक होते.
तानाजी भोसले, अध्यक्ष, वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन संघ म्हणाले, "कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपातग्रस्तांना त्वरित मदत मिळणे आमचा प्राथमिक उद्देश आहे. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून आणि तांत्रिक कौशल्य वापरून आम्ही प्रत्येक रेस्क्यू यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो." अखेर ८–९ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजली पाटील हिला स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात यश मिळाले. त्यानंतर तिला वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांच्या स्वाधीन करून प्राथमिक उपचार दिले गेले. पुढील उपचारासाठी तिला पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती स्थिर आहे.
         या रेस्क्यू मोहिमेत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम चे सदस्य सहभागी होते:
तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे. सर्व सदस्यांनी एकजूट आणि धैर्य दाखवत, सुरक्षित बचाव सुनिश्चित केला.
To Top