सोमेश्वर रिपोर्टर टीम
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला. यानिमित्त विद्यालयांच्या ग्रंथपाल संध्या येवले यांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्र ग्रंथ, शब्दकोश इत्यादी विविध प्रकारची पुस्तके विद्यार्थ्यांना हाताळायला व वाचण्यासाठी उपलब्ध केली होती.
विद्यालयाच्या प्राचार्य श्री जाधव यांनी उद्घाटनपर भाषणात विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी मध्ये फटाके नको पुस्तके हवीत ही संकल्पना राबवण्यासाठी प्रवृत्त केले. फटाक्यांमुळे प्रदूषण होते तर पुस्तके वाचल्याने विचार समृद्ध होतात, ज्ञानात भर पडते व प्रसंगावधान येते. यासाठी सुट्टीत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत यासाठी छोटी आणि माहितीपूर्ण पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध केली होती. विद्यालयाच्या अध्यापिका प्राजक्ता यादव व सीमा पवार यांनी पुस्तक परिचय करून दिला. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, लेखक, प्रकाशक,संपादक इत्यादी माहिती सांगितली व 'शिवाजी कोण होता' या पुस्तकातील काही अंशाचे अभिवाचन केले. यावेळी 'मावळा किट' मध्ये असणाऱ्या ऐतिहासिक घटनांची माहिती सांगणारे खेळ खेळण्यासाठी मांडण्यात आले होते. ऐतिहासिक तपशील व त्यावर आधारित खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. 'माझी वसुंधरा माझी जबाबदारी' या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन गणेश पोंदकुले यांनी याप्रसंगी भरवले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक हनुमंत खरात हे होते. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले तर स्काऊटर युवराज वणवे व अशोक भोसले, गाईडर सविता कांबळे यांनी मार्गदर्शन केले.