सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी मिळालेल्या निधीच्या कामांमध्ये अनियमितता आढळल्याने पुणे -सातारा महामार्गावरील निगडे ता.भोर ग्रामपंचायतीच्या सरपंच नाजुका किशोर बारणे यांना पदावरून दूर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
अनुचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजना अंतर्गत २०२१-२२ या वर्षात ग्रामपंचायत निगडे येथे सुमारे ७.९९ लाख रुपयांच्या रस्ता काँक्रीटीकरण कामात अनियमितता झाल्याची तक्रार निगडे ग्रामस्थ हरिभाऊ मालुसरे यांनी केली होती.जिल्हा परिषदेच्या चौकशीत हे काम दलितवस्तीऐवजी इतर ठिकाणी केल्याचे निष्पन्न झाले.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी सादर केलेल्या सुधारित अहवालात सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रशासकीय आदेशातील अटींचा भंग करून कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे नमूद केले.या निकालाने मी अंशतः आनंदी झालो आहे.नवबौद्ध वस्तीमधील निधी दुसरीकडे वळवणाऱ्या सरपंच ,ग्रामसेवक व शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी मी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करणार आहे असे अर्जदार हरिभाऊ मालुसरे यांनी सांगितले
---------------
सर्व कामे कायदेशीर प्रक्रियेनुसार
सर्व कामे कायदेशीर प्रक्रियेनुसार व संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत असे आपल्यावरचे आरोप फेटाळीत सरपंच नाजूका बारणे यांनी दावा केला.आपिलात जाण्याचेही महिला सरपंच बारणे यांनी सांगितले.परंतु विभागीय आयुक्तांनी त्यांचे स्पष्टीकरण असमाधानकारक ठरवत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) नुसार पदच्युतीचा निर्णय घेतला.