Baramati News l 'सोमेश्वर'चे अंतिम बिल २२६ रुपये तसेच ठेवींवरील व्याज असे २९ कोटी रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून आलेल्या ऊसाला अंतिम दर टनाला ३४०० रुपये जाहीर केला असून उर्वरित टनाला २२६ रुपये तसेच ठेवींवरील व्याज असे २९ कोटी रुपये आज सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
          सन २४-२५ या ऊस हंगामात सोमेश्वर कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ में टन ऊस गाळपासाठी आला होता. त्या ऊस बिलापोटी कारखान्याने टनाला ३१७३ रुपये यापुर्वी शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. कारखान्याने टनाला ३४०० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. त्यापैकी सोमेश्वर मंदिरासाठी टनाला १ रुपया भाग विकास निधी वजा जाता टनाला २२६ रुपये वर्ग केलेले आहेत. तसेच ठेवींवरील व्याज देखील सभासदांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात आले. ऊस बोलपोटी २५ कोटी तर ठेवींवरील व्याजाचे ४ कोटी रुपये असे २९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तसेच आडसाली ऊसाला टनाला ३४०० रुपये, पूर्वहंगामी ऊसाला टनाला ३४७५ रुपये तर सुरू आणि खोडवासाठी ३५५० रुपये अदा करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष जगताप यांनी दिली. 
       जगताप पुढे म्हणाले, सोमेश्वर येत्या गाळप हंगामात १४ लाख टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याकडे ३५ हजार एकरांची नोंद झाली असून अपेक्षित ३१ हजार ५०० एकर क्षेत्रातून ऊस उपलब्ध होईल. सोमेश्वरकडे सभासदांचा साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. दीड ते दोन लाख टन गेटकेन उसाचे नियोजन केले आहे. गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली हंगामासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन ९ हजार ५०० टन क्षमतेने गाळप केले जाईल. हंगामासाठी २२६० बैलगाडी,  ६२० डम्पिंग- ट्रॅक्टर, ३९१ ट्रॅक्टर, २० ट्रक यांचा करार पूर्ण झाला आहे. दिवसेंदिवस मजुरांची टंचाई लक्षात घेता यापुढे हार्वेस्टरला पर्याय नसल्याचे सांगत जगताप यांनी सोमेश्वरने प्रथमच २४ हार्वेस्टरशी करार केले असल्याचे सांगितले. हार्वेस्टर मुळे शेतकऱ्यांचे कमी नुकसान होत असून जमिनीचा पोत सुधारत आहे. 
शेतकऱ्यांनी पाच फुटी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेण्याचे आवाहन पुरुषोत्तम जगताप यांनी केले. 
..............
To Top