सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी आताच्या व पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते पण जवळपास एक वर्ष उलटूनही याविषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. येथील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राजगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कडून करण्यात आली. या संबंधिचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पीकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव, योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बैंक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, काहीकडून तर आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहे.
या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची व परिणामकारक उपाययोजना आहे. ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी. आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये 50 हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी.नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातुन कर्जमुक्त करावे.पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेक मोबदला त्वरित देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख उमेश नलावडे उपतालुकाप्रमुख
बाळासाहेब पिलावरे संघटक नवनाथ भोसले,युवासेना प्रमुख शांताराम दारवटकर उपजिल्हाधिकारी अनिल पारठे,विभाग प्रमुख गणेश उफाळे शंकर मरगळे आदीसह शिवसैनिक तालुकाप्रमुख उपस्थित होते.