Bhor News l संतोष म्हस्के l भोरला खुल्या आरक्षणाने रंगत वाढणार : कमळ फुलणार..! घड्याळाची टिकटिक चालणार की तुतारी वाजणार ? जनतेचे लक्ष

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद तब्बल सतरा वर्षांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सोमवार दि.६ निश्चित झाले आहे.परिणामी मोठी चुरस आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार असून तिरंगी लढतीला रंगत येणार आहे.तर इच्छुकांचा चांगलाच कस लागणार आहे. 
      भोर नगरपरिषदेवर यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची अनेकदा एक हाती सत्ता होती.नगरपरिषदेचा कारभार त्यांच्याच अधिपत्याखाली सुरू होता.मात्र माजी आमदार थोपटे यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेस पक्ष पूर्णता नामशेष झाला असल्याने येऊ घातलेली नगरपरिषदेची निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.), राष्ट्रवादी काँग्रेस ( श. प.) गट अशी तीरंगी होणार असून चांगलीच अटीतटीची होणार आहे.नगरपालिकेच्या रचनेतही बदल झाले असून पूर्वी आठ प्रभाग आणि १७ नगरसेवक होते.यंदा १० प्रभाग असून एका प्रभागात दोन नगरसेवक असतील.त्यामुळे २० नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशी निवडणूक होणार आहे.इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तयारी सुरू केली आहे.मात्र पक्ष श्रेष्ठींकडून कोणाला संधी मिळेल यावर गणिते ठरणार आहेत.
      माजी आमदार संग्राम थोपटे शहरातील विकासाच्या मुद्द्यावर येऊ घातलेली निवडणूक लढवणार असले तरी तर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांनी भोर शहराच्या विकासासाठी सहा महिन्यात कोट्यवधी रुपयांचा निधी टाकून शहरातील  कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत. त्याबरोबरच पाठीमागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगराध्यक्ष यांनी आपल्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना मानसन्मान देऊन योग्य पद्धतीने सांभाळलेले आहे.त्यामुळे तिरंगी लढतीत नगरपरिषदेवर कमळ फुलणार,घड्याळाची टिकटिक चालणार की तुतारी वाजणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
                                     
To Top