सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
सुपा पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीचा आणि थरारक खुनाचा तपास अवघ्या काही दिवसांत उकलत आरोपीस कर्नाटक राज्यातून शिताफीने अटक केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सुपा पोलीस स्टेशनचा तपासाचा दर्जा आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे.
२४ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश शंकर चव्हाण (वय ४९, रा. आंद्रफळी ता. शिराटी, जि. गदग, कर्नाटक सध्या रा. नारोळी ता. बारामती) हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तपास सुरू असतानाच सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना माहिती मिळाली की, नारोळी गावातील छाया रमेश महाडिक यांच्या फार्महाउस परिसरातील मुरूमाच्या ढिगाऱ्याखालीतून दुर्गंधी येत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि नवसरे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता, मुरूमाखाली एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला.ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना बोलाविण्यात आले असता त्यांनी मृतदेह हा गणेश शंकर चव्हाण यांचा असल्याची खात्री केली.
प्राथमिक तपासात नागराज उर्फ नागेश विरूपक्षाअप्पा गडियप्पनवर (वय ३४, रा. असुंडी ता. राणेबेन्नुर, जि. हावेरी, कर्नाटक) याने कोणत्यातरी कारणावरून गणेश चव्हाण यांचा खून करून मृतदेह मुरूमाखाली पुरल्याचे निष्पन्न झाले.नया प्रकरणी रूपेश दिनानाथ साळुंखे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
-सपोनि मनोजकुमार नवसरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र तपास पथके तयार केली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपी कर्नाटक राज्यातील राणेबेन्नुर (जि. हावेरी) येथे असल्याचे समजले. पोलिस उपनिरीक्षक जिनेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रूपेश साळुंखे, किशन ताडगे, निहाल वणवे यांचा समावेश असलेले पथक तातडीने कर्नाटकात रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात यश आले. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यास दि. ३ ऑक्टोबर रोजी सुपा पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली असून दि. ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स.पो.नि. मनोजकुमार नवसरे,
पो.स.ई. जिनेश कोळी, पो.स.ई. जयंत ताकवणे,
पो.हवा. रूपेश साळुंखे, संदीप लोंढे, विशाल गजरे,
पो.कॉ. तुषार जैनक, किशन ताडगे, सागर वाघमोडे, महादेव साळुंके, निहाल वणवे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.