सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) येथील मुरूम विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा यंदा ऑडिट रिपोर्ट उपलब्ध नसल्याने सत्तर वर्षांच्या इतिहासात प्रथमच तहकूब करावी लागली. या अनपेक्षित प्रकारामुळे संचालक मंडळावर नामुष्की ओढवली असून, ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार वर्षांपूर्वी झालेली या सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक तालुक्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत सोसायटीवर गैरव्यवहार, अनियमितता आणि मनमानी कारभाराच्या आरोपांनी सावली टाकली आहे. सहकार खात्याच्या चौकशीत २० लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, कलम ८८ नुसार कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच चार संचालकांकडे लाखो रुपयांची थकबाकी असून, ३० जूननंतर ते थकीत कर्जदार घोषित करण्यात आले आहेत. वार्षिक सभेसारख्या महत्वाच्या बैठकीत तब्बल पाच संचालक गैरहजर राहिल्याने सभासदांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मध्यम मुदत व पीक कर्जांची वसुली न झाल्याने सुमारे दीड ते पावणेदोन कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. सभासदांनी चार संचालकांची अपात्रतेची मागणी लावून धरली असून, सचिवांनी सहकार विभागाकडे तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत बारामती दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पी के जगताप, डॉ. अमोल जगताप, हर्षल जगताप, अजय जगताप, प्रवीण चव्हाण, दीपक जगताप, प्रमोद जगताप, बंटी जगताप, फत्तेसिह चव्हाण आदी सभासदांनी या विषयावर अनेक प्रश्न उपस्थित केले.
ऑडिट रिपोर्ट अभावी संस्थेच्या कारभारावर पडदा राहिल्याने सभासदांत असंतोष आहे. सोमेश्वर परिसरात या घडामोडींवर उलटसुलट चर्चा सुरू असून, या घटनेने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.