सुपे परगणा l मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणारी टोळी शिताफीने गजाआड : सुपा पोलिसांची कामगिरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपा पोलीस स्टेशनच्या दक्ष गस्त पथकाने मोबाईल टॉवरच्या केबल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला शिताफीने पकडण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
           दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत हे रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तरडोली (ता. बारामती) येथे एका पञ्याच्या शेडमध्ये काही इसम मोबाईल टॉवरच्या चोरलेल्या केबलमधून तांब्याच्या तारा वेगळ्या करत आहेत. ही माहिती खात्रीलायक असल्याचे लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी स.पो.नि. मनोजकुमार नवसरे यांनी तात्काळ पथक तयार केले. पहाटे सुमारे तीन वाजता पोलीस पथकाने छापा टाकला असता चार जणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यामध्ये
१) ओम राजेंद्र कासवदे (१९),
२) संतोष सतिश गायकवाड (१९),
३) करण भाउसाहेब आरवडे (१९) — सर्व राहणार मोरगाव,
आणि
४) आण्णा आंबादास कोकाटे (२९, रा. कुंभेजा, ता. परांडा, जि. धाराशिव)
यांचा समावेश आहे.

सदर ठिकाणाहून ३ केबल कटर, टॉवर केबल आणि सोललेल्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपी समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यांच्याविरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.बअटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दि. १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख ५० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत स.पो.नि. नवसरे, पोसई कोळी, मोहरकर, जयंत ताकवणे, सहा. फौजदार वाघोले, पो.हवा. भाग्यवंत, गजरे, साळुंके, लोंढे, दणाने, पो.कॉ. अमोल चिरमे, किसन ताडगे, महादेव साळुंके, तुषार जैनक, निहाल वणवे, सागर वाघमोडे आणि सचिन दरेकर यांनी सहभाग घेतला.
सदर मोहिम पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
To Top