Baramati News l वाणेवाडीत अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी होणार...! राज्य शासनाची मंजुरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ग्रामपंचायतीसाठी अत्याधुनिक प्रशासकीय इमारतीची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी मागितलेली गायरान जागा राज्य शासनाने उपलब्ध करून देण्याचा निर्णय दिला असून यामुळे विकासाच्या दिशेने ग्रामपंचायतीला मोठी चालना मिळाली आहे.
         गायरान गट क्रमांक ८० मधील १५ गुंठे जागा ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानमुळे हा जागा देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंजूर झाला असल्याची माहिती सरपंच गीतांजली दिग्विजय जगताप यांनी दिली. नवीन ग्रामपंचायत भवन दुमजली स्वरूपात उभारण्यात येणार असून गावाला आवश्यक सर्व प्रशासकीय सुविधा या इमारतीत उपलब्ध होणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारी ही वास्तू भविष्यात वाणेवाडीची शान ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जागेच्या प्रस्तावास मंजुरी दिलेबद्दल तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कार्यवाही करण्याकामी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्वाचे ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गीतांजली जगताप आणि उपसरपंच अजित भोसले यांनी आभार व्यक्त केले.
    ग्रामीण विकासाच्या या महत्वपूर्ण कामासाठी सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांचा मिळालेला पाठिंबा लक्षणीय असून अजितदादांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकास प्रवासाला नवा वेग मिळेल, असे वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप यांनी व्यक्त केले.
To Top