राजगड l कोंढावळे खुर्दमध्ये बिबट्याचा हल्ला; शेळी ठार : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..! वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यात अजूनही बिबट्याने ठाण मांडल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. कोंढावळे खु. गावातील डोंगर परिसरात धनगर समाजाचे रामभाऊ झिलू ढेबे हे (दि. २५ नोव्हेंबर २५) रोजी सायंकाळी सुमारे ४.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या शेळ्यांच्या कळपासह जात असताना झुडपात लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात एक शेळी ठार झाली आहे.

आपले पशुधन वाचवण्यासाठी रामभाऊ ढेबे यांनी आरडाओरड करत बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने आपली शिकार सोडून झाडी-झुडपात पळ काढला. हा बिबट्या साधारण १ ते २ वर्ष वयाचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच कोंढावळे बु.चे पोलीस पाटील उल्हास भुरुक व कोंढावळे खु.च्या पोलीस पाटील सौ. रेणुका शंकर खोपडे यांनी तात्काळ वनविभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले. यानंतर वनविभागाचे अधिकारी विकास निकम व विलास गाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थ संभाजी भुरुक व सुरेश ढेबे उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मागील महिन्यातही रामभाऊ ढेबे यांच्या शेळी कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या वेळी दोन शेळ्या ठार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले की, 'ज्या ठिकाणी बिबट्याला भक्ष्य मिळते त्या ठिकाणी तो वारंवार येतो, त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी किंवा दिवसा आपली जनावरे बंदिस्त ठिकाणी ठेवावीत, बिबट्या दिसल्यास सुरक्षित अंतर राखावे, एकत्र समूहात राहावे व कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून निवी, वरोती, अंत्रोली, घिसर, भट्टी, केळद, पासली, सिंगापूर, मोहरी, तोरणागड परिसर, धानेप, कोंढवळे, एकलगाव, कोळवडी-कातवडी मार्ग, आंबवणे व पाबे घाट या भागात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या सततच्या हल्ल्यांमुळे राजगड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग व प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
To Top