सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील आपटी-निगुडघर परिसरातील करंजगाव ता. भोर येथे बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत सुमारे १७ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून लंपास केला.ही घटना शुक्रवार दि. १४ घडली.याबाबत मारुती भैरू मळेकर रा. करंजगाव ता.भोर यांनी भोर पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारुती भैरव मळेकर पत्नीसोबत नातूच्या पाचवीच्या कार्यक्रमासाठी महुडे ता.भोर येथे सूनेकडे गेले होते. पाचवीचा कार्यक्रम करून परत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून सुमारे ३० हजार रोख रक्कम व २८ तोळे ६.५ ग्रॅम सोने असे एकूण १७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. सध्या ग्रामीण भागात भात कापणीची लगबग सुरू असून शेतकरी घरांना कुलूप लावून शेतात कामासाठी जात असतात.चोरटे बंद घरे फोडू लागल्याने शेतातील काम करायचे की घरी बसून राहायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी पोलिस निरीक्षक आण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस दिप्ती करपे, ठाणे अंमलदार सुनील चव्हाण तपास करीत आहे.
