सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील नळपाणी पुरवठयाच्या दोन विहिरी आणि सुपे गावठाणातील असणाऱ्या राखुंडीच्या विहिरीवर सौर पंप बसाविण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे वीज खंडीत असली तरी सुद्धा अखंडीत नळपाणी पुरवठा सुरु राहणार आहे.
अटल ऊर्जा सौर पंप जलपुरवठा व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत पुणे येथील सेवावर्धिनी या संस्थेच्यावतीने १० एच पी, ७.५ एच पी आणि १ एच पी असे तीन सौर पंप बसाविण्यात आले आहे. या सौर पंपास पीटीसी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळाले आहे. या उपक्रमामुळे सुपे गावाला जलपुरवठा व्यवस्थेत आत्मनिर्भरता प्राप्त होऊन, वीज खर्चात बचत आणि पाण्याचा सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित होणार आहे. हा प्रकल्प ग्रामीण भागात शाश्वत ऊर्जा वापराचे आदर्श उदाहरण ठरणार आहे.
येथील नळपाणी पुरवठ्याच्या शासकीय विहिरींवर सौर ऊर्जा पंप कार्यान्वित करण्यात आले आहे. या सौर पंपाचे उद्घाटन येथील सरपंच तुषार हिरवे आणि सेवावर्धिनी संस्थेचे कार्यवाहक सोमदत्त पटवर्धन, गिरीजा सिरशीकर आणि दिपक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी येघील उपसरपंच शंकर शेंडगे, शफिक बागवान, विशाल चांदगुडे, सुधीर बारवकर, वैष्णवी बारवकर, वसीम तांबोळी, बजरंग हिरवे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश गावाचा जलपुरवठा शाश्वत, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या कमी खर्चिक करणे तसेच गावातील पाण्याचा पुरवठा नियमितपणे होण्यास मदत होणार असल्याची माहिती सोमदत्त पटवर्धन यांनी दिली.
सेवावर्धिनी ही संस्था मागील २५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जलसंधारण, रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि ग्रामीण विकास आदी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून ही संस्था सक्षमीकरण करत आहे. तर स्थानिक संस्थांना सहकार्य करून शाश्वत विकासाची चळवळ उभी करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सेवावर्धिनी संस्थेचे दिपक आव्हाड यांनी दिली.
.....................................
