सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा भंडाफोड करत लोणंद पोलिसांनी सुमारे तब्बल 87 लाख 76 हजार 903 रुपयांच्या मालमत्तेच्या अपहार प्रकरणी एका माजी केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अन्न–धान्य साठवण व्यवस्थापनातील मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये अजून बडे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडगाव (ता. फलटण) येथील लोणंद वखार केंद्रात 6 जून 2016 ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत आरोपी समीर अशोक नाडगौड याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे समोर आले आहे.
सदर आरोपीने केंद्रप्रमुख असताना गहू 762 पोती (किंमत ₹10,56,955), तांदूळ 576 पोती (किंमत ₹11,65,936) असा एकूण 1338 पोत्यांचा (किंमत ₹22,22,891) अपहार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.केवळ तेच नव्हे तर IRRS व DOS प्रणालीमध्ये खोटी नोंदी करून ₹65,54,012 रुपयांच्या तांदळाचा अपहार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अशा प्रकारे एकूण अपहार रक्कम तब्बल ₹87,76,903 इतकी असल्याचे म्हटले जाते.
फिर्यादी तृप्ती कोळेकर, विभागीय प्रमुख (कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ) यांनी फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आणला. त्यांच्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी समीर नाडगौड याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. PSI हेगडे यांचेकडे तपासाची जबाबदारी असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वखार व्यवस्थापनातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा गैरव्यवहार मानला जात असून, धान्य पुरवठा साखळीवरचे सुरक्षाकवच किती पातळ आहे, हे पुन्हा एकदा उजेडात आले आहे.
