सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती: प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील भारत ज्ञान विज्ञान समुदाय संघटनेने सोलापूर जिल्ह्यातील पाच प्रथमीक शाळांतील २०० विद्यार्थ्यांना ६०० रुपये किंमतीचे शैक्षणिक कीटचे वाटप करण्यात आले.
सोलापूर, धाराशिव आणि मराठवाडा परिसरातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली.१७० वर्षांनंतर पहिल्यांदाच सीना नदीला एवढा पूर आला. नदीकाठच्या गावांचा, वाड्यावस्त्यांचा, शाळांचा, शेतकऱ्यांच्या घरांचा आणि गोठ्यांचा अक्षरशः अवकाळी नाश झाला. जगाच्या पोशिंद्याला अस्मानी-सुलतानी दोन्ही संकटांनी घेरले. अशा वेळी समाजभान जपणाऱ्या “भारत ज्ञान विज्ञान समुदाय, बारामती” या सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या संघटनेने पुढाकार घेत पूरग्रस्त भागासाठी मदतीचा निधी गोळा करण्याचा संकल्प केला.
त्यांनी अशा पाच जिल्हा परिषद शाळा निवडल्या जिथे पूराच्या पाण्यात वह्या-दप्तरं, शैक्षणिक साहित्य वाहून गेलं होतं आणि गरीब मुलांच्या शिक्षणावर गदा आली होती. या उद्देशाने सव्वा लाख रुपये निधी गोळा करून प्रत्येकी ६०० किंमतीचे २०० शैक्षणिक किट्स तयार करण्यात आले आणि ती मुलांच्या शाळेतच जाऊन प्रत्यक्ष वाटप करण्यात आली. या किटमध्ये होते: दोन तळीचा जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, चित्रकला वही, तेल खडू पेटी, पेन-पेन्सिल पाऊच, पट्टी, खोडरबर, शार्पनर, दप्तर (सॅक), अंकलीपी, रायटिंग पॅड, अशा वस्तू जे मुलांना पहिल्यांदाच मिळाल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रत्येक दात्याचा हेतू सफल झाला.
हा निधी गोळा करण्यामध्ये पुढील शाळा, संस्था व नागरिकांनी अमूल्य सहभाग दिला न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी, सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर, विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरनगर, करंजे माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी, बा. सा. काकडे विद्यालय निंबुत, माध्यमिक विद्यालय खंडोबाची वाडी, न्यू इंग्लिश स्कूल वाकी, साद संवाद ग्रुप वाणेवाडी, समाजसेवा व्हॉट्सॲप ग्रुप, मेडिकल ग्रुप वाणेवाडी, विद्यार्थ्यांनी घराघरातून पैसे गोळा केले. सफाई कामगार, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, सरकारी कर्मचारी अशा सर्व स्तरातील लोकांनी या उपक्रमासाठी हातभार लावला.
तसेच वाघळवाडीचे प्रा. दत्तात्रय हेगडे (निवृत्त विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, प. स. बारामती) यांनी ८० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देऊन योगदान दिले.
