सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : प्रतिनिधी
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीबाबत प्रशासकीय मंजुरी प्रमाणे १२ खोल्याच बांधण्यात याव्यात तसेच १ कोटी ४० लाखाच्या निधीत १२ खोल्या बांधणे कंत्राटदार याला परवडत नसेल तर कंत्राटदार बदलण्याच्या ठराव तक्रारवाडी येथील ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला . या ग्रामसभेला सरपंच प्राजक्ता वाघ ,उपसरपंच मंदाकिनी मोरे ,ग्रामसेविका शोभा जाधव ,राष्ट्रवादी पक्षाच्या सीमा काळंगे ,भाजपाचे सचिन वाघ ,माजी सरपंच शामराव वाघ ,शालेय समितीचे अध्यक्ष जयदीप जाधव ,संजय मोरे ,गणेश वायदंडे ,राजेंद्र गोडसे ,विलास गडकर,गणेश जाधव उपस्थित होते.
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेला १२ वर्ग खोल्यासाठी १ कोटी ४० लाख रुपयाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.मात्र सबंधित अधिकारी आणि अभियंता यांनी गावातील कोणालाही विश्वासात न घेता १२ खोल्याच्या एवजी ८ खोल्यांचे टेंडर काढून जवळच्या कंत्राटदार यांना ते मंजूर केल्याचा संशय गावकरी व्यक्त करीत आहेत.तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयदीप जाधव यांना याची कोणतीही माहिती न देता सबंधित कंत्राटदार आणि अभियंता यांनी काम सुरु करण्याचा घाट घातला होता.याला शालेय समिती ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी कडाडून विरोध करीत १२ खोल्याच्या निधीत १२ खोल्याच बांधल्या जाव्यात अशी आग्रही मागणी केली .यानंतर गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी शाळेला भेट देत याची माहिती घेतली.यावेळी नागरिकांनी खुडे यांच्या समोर विषय मांडून १२ खोल्या बांधल्या जाव्यात अशी मागणी केली.तर खुडे यांनी हि बाब वरिष्ठ कार्यालयाला कळविण्याची भूमिका घेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.याच वेळी शिक्षण समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी ठराव घेवून १२ खोल्याच व्हाव्यात अशी मागणी केली.आज झालेल्या ग्रामसभेमध्ये शामराव वाघ ,राजेंद्र गोडसे ,गणेश वायदंडे ,गणेश जाधव ,सीमा काळंगे यांनी ठाम भूमिका घ्रेत १२ खोल्याच बांधण्यात याव्यात अशी मागणी केली.याचा ठराव सर्वानुमते घेवून घेत ठरावाची प्रत गटविकास अधिकारी यांना देण्याचे सांगण्यात आले.यावेळी तक्रारवाडी गावातील मातंग समाजासाठी समाज मंदीर बांधण्याची मागणी नवनाथ पाटोळे यांनी मागणी करीत प्रशासनाने जागा त्वरित उपलब्ध करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना ग्रामस्थांनी पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात काहीतरी खिचडी शिजली असल्याचा संशय व्यक्त करीत शाळेची खोली आणि मॉडेल खोली यात नक्की काय फरक असल्याचे अभियंता यांनी दाखवून द्यावे अशी मागणी केली.४ खोल्यांचा निधी मध्ये सिमेंट खडी स्टील आणि वीट सोडून इतर काही वापरणार आहे काय असा सवाल करीत तालुक्यात धुमाकूळ घालणारी मलिदा गँग शाळेच्या कामात आलीय काय असा प्रश्न मांडला.तर या विषयी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलसो यांच्या कार्यालयात जावून त्यांना हि वस्तुस्थिती सांगण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
