Khandala Breaking l मारहाणीत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू..! शिरवळ पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या : आरोपींना कठोर शासनाच्या मागणीसाठी शिरवळकर रस्त्यावर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी  
शिरवळ ता.खंडाळा येथील आतिश अशोक राऊत (वय २३ रा.जूनी माळआळी, शिरवळ ता.खंडाळा) मध्यरात्री पळशी यासह विविध ठिकाणी नेत बेदम मारहाणी मध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी शिरवळ ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे.यावेळी याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी तीन जणांना मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.दरम्यान,मारहाणीत मृत्यू झालेल्या आतिश राऊत यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन लवकरात लवकर होण्यासाठी व आरोपींना लवकरात लवकर अटक होण्यासाठी शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या शिरवळ बंदला अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी 100 टक्के दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शवला तर शिरवळ ग्रामस्थांनी आतिश राऊत याच्या खुनामध्ये सहभागी आरोपींना लवकर अटक करावी मोठ्या प्रमाणात शिरवळ ग्रामस्थांनी एकत्रित येत आतिश राऊत याचा मृतदेह शिरवळ पोलीस स्टेशनसमोर आणल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के व शिरवळ पोलीसांनी तपासाबाबत माहिती देत समजूत काढल्यानंतर तणावाची परिस्थिती निवळत शिरवळ येथील वैकुंठ स्मशानभूमी याठिकाणी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात शिरवळ पोलीस स्टेशन व शिरवळ याठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिरवळ ता.खंडाळा येथील आतिश राऊत याला पळशी येथील तेजस भरगुडे व दिपक भरगुडे यांच्यासहित युवकांनी बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी करीत अपघात दाखविण्याचा बनाव उघडकीस आणण्यात शिरवळ पोलीसांना शिरवळ ग्रामस्थांच्या सतर्कतेने यश आले होते यावेळी मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या आतिश राऊत याचा उपचारादरम्यान पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शिरवळमध्ये संतापाची लाट उसळली होती.यावेळी शिरवळ पोलीसांनी अशोक राऊत यांच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक डॉ.वैशाली कडुकर,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 12 तासांच्या आत तेजस बाळासो भरगुडे(वय 34),दिपक बाळासो भरगुडे(वय 32,दोघे रा.पळशी ता.खंडाळा),हृषीकेश जगन्नाथ मळेकर(वय 28,रा.शिंदेवाडी ता.खंडाळा)यांना जेरबंद करण्यात यश मिळविले.यावेळी तेजस भरगुडे,दिपक भरगुडे,हृषीकेश मळेकर यांना शिरवळ पोलीसांनी अटक करीत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने बुधवार 7 जानेवारी पर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान,गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,सातारा व शिरवळ पोलीसांचे तपास पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के ह्या अधिक तपास करीत आहे.
--–------
शिरवळ बंद 100 टक्के यशस्वी
शिरवळ येथील आतिश राऊत याच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्यानंतर शिरवळ ग्रामस्थांनी शिरवळ बंदची हाक दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला.या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान,मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शासन करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात शिरवळ ग्रामस्थ जमल्याने व मृतदेह पोलीस स्टेशन याठिकाणी आणल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी शिरवळ पोलीसांनी समजूत काढल्यानंतर जमाव शांत झाला.
To Top