सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : गणेश भंडलकर
कोरेगाव (ता. फलटण) हद्दीत भीषण अपघातात एकाच मृत्यू झाला असुन चारचाकी चालक फरार झाला आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत पुणे–पालखी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
मृत तरुणाचे नाव सुरज रवींद्र वाघमोडे (रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे आहे. सुरज हा आपल्या युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक MH-12 YY-0965) वरून फोंडशिरस येथून पुण्याच्या दिशेने जात असताना, कोरेगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत सुनील बाबुराव गोवेकर यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात सुरज गंभीर जखमी झाला. मात्र, धडक दिल्यानंतर संबंधित वाहनचालकाने जखमीस उपचारासाठी न नेता तसेच अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. अपघातानंतर सुरजची मोटारसायकल शेजारील चारीत पडलेली आढळून आली. गंभीर जखमांमुळे सुरजचा मृत्यू झाला असून त्याच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी मयताचा मामेभाऊ विकास शंकर ठोंबरे (वय 25, व्यवसाय शेती, रा. फोंडशिरस) यांनी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार योगेश कुंभार करत असून, लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
------------------------
सदोष पालखी महामार्गावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार?
पंढरपूर–पुणे या पालखी महामार्गावर सातत्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. कोरेगाव रेल्वे ब्रिज परिसरात तर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रस्त्याची धोकादायक रचना आणि भारवाहू वाहनांचा वाढता वेग यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा जीव धोक्यात येत आहे. संबंधित विभागांनी या मार्गावरील सदोष ठिकाणे दूर करून सुरक्षा उपाययोजना केल्या तरच अपघातांची भयावह मालिका थांबेल, अशी स्थानिकांची मागणी आहे. यापूर्वी या रस्त्यावर ११ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर, ४ डिसेंबर रोजी आणि आता १३ डिसेंबरच्या अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.
