सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : सतीश गायकवाड
चिमणगाव, ता. कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्समध्ये उसाचे खोटे वजन दाखवून तब्बल एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कारखान्यातील वजनकाटा कारकून, त्याचा साथीदार व एक ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिळाली.
कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदिप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना ५० टनी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर दर्शन प्रताप शेडगे हा कारकून म्हणून कार्यरत होता. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात रात्रीच्या शिफ्टदरम्यान शेडगे याने आपल्या साथीदारांसोबत संगनमत करून खोटे वजन दाखविण्याचा गैरप्रकार केला.
वजनकाट्यावर जास्त वजनाच्या ट्रॉलीचे वजन घेऊन टोकन पंच केल्यानंतर, ड्रायव्हर निघताच शेडगे हा आपल्या मित्र रोहन विजय पवार याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचा टायर नंबर मॅन्युअली कॉम्प्युटरमध्ये टाकत होता. त्यामुळे प्रत्यक्षात न आलेल्या पवार यांच्या ट्रॉलीला आधीच्या जड ट्रॉलीचे वजन लावले जात होते. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला. चौकशीत शेडगे आणि पवार यांनी तोंडी व लेखी कबुलीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या पद्धतीने तिघांनी मिळून पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन असे एकूण ३० टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली. प्रकार उघड झाल्यानंतर कारखाना प्रशासनाने चौकशी करून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दर्शन प्रताप शेडगे (रा. चिमणगाव), रोहन विजय पवार (रा. वाघजाईवाडी) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे) या तिघांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत.
