Baramati News l वाणेवाडी येथे मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न फसला : सतर्कतेमुळे अनर्थ टळला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी (मळशी) येथे काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप-कोयंडा तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. 

 मळशी येथील कै. संपतराव जगताप यांच्या वस्तीवर चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने धुमाकूळ घातल्याची घटना घडली. चोरट्यांनी प्रथम घराबाहेरील लाईट बंद करून परिसर अंधारात टाकला. त्यानंतर घराची दारे उघडण्याचा प्रयत्न करत कड्या तोडल्या. घरात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण घराची झडती घेतली असून घराभोवती असलेले तारेचे कुंपण दोन ठिकाणी तोडले आहे. तसेच मुख्य गेटही तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या घटनेत चोरट्यांची संख्या सुमारे चार पेक्षा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, ते चारचाकी वाहनातून घटनास्थळी आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अविनाश जगताप यांनी संशयास्पद हालचाली लक्षात येताच जोरात आरडाओरडा केला. मात्र, त्यानंतरही चोरटे तटस्थ राहून दार तोडण्याचा प्रयत्न करत होते.
घरातील सदस्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि आरडाओरड्यामुळे अखेर चोरट्यांचा डाव फसला व ते घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रकारामुळे वाणेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगावी, तसेच संशयास्पद व्यक्ती व वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस जमादार रमेश नागटीळक यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
To Top