सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बीड : प्रतिनिधी
काहीतरी नवीन करून दाखवू ही जिद्द उराशी बाळगून बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांचा परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. मिरजगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मातकुळी येथील दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून खांबकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मातकुळी येथील श्रीकांत नानासाहेब खांबकर (वय २०) आणि महेश आप्पासाहेब खांबकर (वय २२) हे दोघे तरुण शेतकरी बारामती येथे आयोजित भव्य कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. दिवसभर प्रदर्शनातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचे नवनवीन प्रयोग पाहून ते रात्री गावाकडे परतत होते.
जामखेड-श्रीगोंदा रोडवरील मिरजगाव जवळ एका पुलावर त्यांची दुचाकी आली असता, समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची गाडी पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतला.
श्रीकांत आणि महेश हे दोघेही कष्टाळू तरुण होते. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने 'केळीची बाग' फुलवण्याचे त्यांचे स्वप्न होते. याच विषयातील तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती घेण्यासाठी त्यांनी बारामती गाठली होती. मात्र, प्रगत शेतीचे स्वप्न डोळ्यांत घेऊन घरी परतत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
नात्याने चुलत भाऊ असलेल्या या दोन्ही उमद्या तरुणांवर वनवेवाडी मातकुळी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील दोन कर्तबगार मुलांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
