Phaltan Breaking l लाकडे कापण्याच्या मशीनने केले मृतदेहाचे तुकडे...! अनैतिक संबंधातून तरुणाचा निर्घृण खून; तिघांना अटक : फलटण तालुका हादरला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयातून तिघांनी मिळून एका तरुणाचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यात उघडकीस आली आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमंथळी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील सतीश उर्फ आप्पा दादासों दडस (वय २७) हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक २१ जानेवारी  रोजी त्याचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात  दाखल केली होती.
                   या मिसिंग प्रकरणात घातपात झाल्याची गोपनीय माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात असे निष्पन्न झाले की, मौजे विडणी येथील संशयित रेखा लक्ष्मण बुधावले हिचे सुरुवातीला सतीश तुकाराम माने याच्याशी प्रेमसंबंध होते. पुढे तिचे मयत सतीश दडस याच्याशी संबंध निर्माण झाल्याने त्याचा राग मनात धरून कट रचण्यात आला.गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित लखन बंडू बुधावले व सतीश तुकाराम माने यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा नाकारला. मात्र, पुढे रेखा लखन बुधावले हिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच तिने खळबळजनक कबुली दिली.
तिच्या कबुलीनुसार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी प्रेमसंबंधाच्या कारणावरून सतीश उर्फ आप्पा दडस याच्याशी सतीश माने व लखन बुधावले यांचा वाद झाला. या वादातून लोखंडी रॉडने मारहाण करून सतीश दडस याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर दवाखान्यात नेत असल्याचा बनाव करून त्याला विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेण्यात आले. तेथे डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिघांनी मिळून मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले. हे तुकडे दोन पोत्यांत भरून साठेगाव हद्दीतील शेततळे व निरा नदीच्या पात्रात वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचे तपासात उघड झाले.

मिसिंगच्या तपासातून उलगडलेल्या या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्यात फलटण ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीनही आरोपींना अटक करून मोठे यश मिळवले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी  तुषार दोशी (पोलीस अधीक्षक),  वैशाली कडुकर (अपर पोलीस अधीक्षक) व  विशाल खांचे (उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप जगताप (पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपासात प्रशांत सुबनावळ (सहा. पोलीस निरीक्षक) यांच्यासह डी.बी. पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक पवार, शिवानी नागवडे, प्रदीप खरात, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे, शिवराज जाधव, अमोल देशमुख, सुरज काकडे, अविनाश शिंदे, यु.आर. पेदाम व गौरी सावंत—यांनी मोलाची भूमिका बजावली.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.
To Top