बीड : प्रतिनिधी
बीड शहरातील अंकुश नगर भागात दिवसाढवळ्या झालेल्या हर्षद शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या चार दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजी नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले.
हर्षद तुळशीराम शिंदे (वय ३८) हे नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. अंकुश नगर परिसरात पाईपलाईनचे काम सुरू असताना आरोपीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने सुरुवातीला हर्षद यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या, मात्र त्या चुकल्याने हर्षद यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, आरोपीने पाठलाग करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तीन पथके तैनात केली होती. आरोपी कळंबहून केजच्या दिशेने दुचाकीवरून येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शिवाजी नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
