सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बीड : प्रतिनिधी
गुंतवणूक करा आणि तीन महिन्यांत पैसे दुप्पट मिळवा, अशा अमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्या एका व्यक्तीला बीड सायबर पोलिसांनी दिलासा दिला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे फसवणुकीतील ४ लाख ६८ हजार रुपये वसूल केले असून, ही रक्कम आज पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते तक्रारदाराला सुपूर्द करण्यात आली.
बीड येथील रहिवासी विलास ज्ञानोबा नाईकवाडे यांना 'ग्लोबल कॅपिटल एफ एक्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास दररोज ०.५० ते १ टक्का व्याज आणि तीन महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून नाईकवाडे यांनी २४ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीत ५,३८,५०० रुपये ऑनलाईनद्वारे, तर ४,५०,००० रुपये रोख स्वरूपात आरोपी ज्ञानेश्वर दिगांबर चाटे याला दिले होते. एकूण ९,८८,५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांचा असा लागला तपास सायबर पोलिसांनी गुन्हा र. नं. २७/२०२५ अन्वये (BNS कलम ३१८(४), ३(५) व माहिती तंत्रज्ञान कायदा ६६, ६६(क)) गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान: बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचे खाते गोठवण्यात आले, ज्यातून २,६८,००० रुपये जप्त झाले. आरोपीकडून २,००,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले. अशा प्रकारे एकूण ४,६८,००० रुपये वसूल करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रक्कम सुपूर्द आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते ही रक्कम विलास नाईकवाडे यांना सन्मानाने परत करण्यात आली. आपली कष्टाची कमाई परत मिळाल्याने तक्रारदाराने पोलिसांचे आभार मानले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश केळे, सपोनि संदीप अराक, भारत जायभाये, विजय घोडके, निलेश उगलमुगले आणि श्रीकृष्ण टेकाळे यांच्या पथकाचा समावेश होता.
कोणतीही ऑनलाईन गुंतवणूक करण्यापूर्वी खात्री करा. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा नजीकच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
— सायबर पोलीस ठाणे, बीड
