Bhor News l संतोष म्हस्के भोरला जिल्हा परिषद व पं.समितीला पंचरंगी लढतीचे चित्र : इच्छुकांकडून मोर्चे बांधणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
तब्बल नऊ वर्ष न्यायालयीन कचाट्यात अडकलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या.राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि.१३  निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
           भोरला ४ गटांसाठी तर ८ गणांसाठी निवडणूक होणार असून १ लाख ५४ हजार ८१० मतदार मतदान करणार आहेत.दरम्यान भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,शिवसेना शिंदे गट अशी पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र असून यांच्या इच्छुक उमेदवारांनी युद्ध पातळीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
      मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल चार वर्षाहून अधिक कालावधीनंतर होणारा असल्याने भोर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणी मतदारांशी संपर्क आणि शक्ती प्रदर्शनाला वेग आला आहे.कोण देवदर्शन,बैलगाडा शर्यती तर कोण होम मिनिस्टर, क्रीडा व कुस्त्यांच्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहे.माजी आमदार संग्राम थोपटे भाजपा तर आमदार शंकर मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर शिवसेना शिंदे गट व शिवसेना उबाठा तसेच काँग्रेस यांच्याकडूनही निवडणूक जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा लढणार असल्याने पंचरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. साधारणता एक जिल्हा परिषद गट सुमारे ४० हजार तर पंचायत समितीचा एक गन सुमारे ,२० हजार मतदार संख्येचा आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत चार गटांपैकी तीन गट सर्वसाधारण (खुले )असून एका गटाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे.अनेकांकडे कुणबी दाखले असल्याने आजी-माजी सदस्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.मागील पंचवार्षिकच्या निवडणुकीत भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस(सध्याची भाजपा) आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आला होता.तर पंचायत समितीत राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक सदस्य विजयी झाला होता.यंदाच्या निवडणुकीत कसे चित्र राहणार की कोणाची एकाची एक हाती सत्ता येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड 
      भोर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पूर्वीची काँग्रेस यामध्ये प्रामुख्याने लढत होत होती.सध्या पूर्वीच्या काँग्रेसचे मात्र आत्ताच्या भाजपाचे माजी आमदार संग्राम थोपटे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तर १६ नगरसेवक भाजपाचे निवडून आल्याने जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड असल्याचे समोर येत आहे.
--------------
४ गटात आणि ८ गणात होणार चुरशीची लढत 
यंदाच्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे, शिवसेना उबाठा तसेच काँग्रेस पक्षाचे इच्छुकांमध्ये तुल्यबळ असे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान चार गटात व आठ गणात मोठी चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.
                                       
To Top