सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पाचगणी : सचिन भिलारे
भिलार प्रतिनिधी "स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही," हे विधान बीड जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कन्येने सत्य करून दाखवले आहे. परळी तालुक्यातील ऊर्मिला दत्तू जगताप हिने गरिबी आणि शेजाऱ्यांच्या टोमण्यांवर मात करत महावितरणमध्ये (MSEB) तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती मिळवली आहे. ३० सप्टेंबर २०२५ रोजी तिने पाचगणी येथे आपली पहिली जॉइनिंग घेत टेक्निशियन' म्हणून कामाला सुरुवात केली आहे.
टोमणा ठरला यशाची ठिणगी
ऊर्मिलाचा हा प्रवास सोपा नव्हता. लहान असताना त्यांच्या घरी एक विजेचा बल्ब खराब झाला होता. तो बदलण्यासाठी शेजारी राहणाऱ्या एका आयटीआय झालेल्या विद्यार्थ्याला बोलावले होते. त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी, "आम्ही मुलाला तुमच्या घरचे बल्ब बदलण्यासाठी शिकवले नाही," असे म्हणून ऊर्मिलाच्या पालकांचा अपमान केला होता. हा अपमान ऊर्मिलाच्या जिव्हारी लागला आणि तिने त्याच क्षणी ठरवले की, आपणही याच क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण करायची.
कष्टातून घडले यश
ऊर्मिलाचे वडील दत्तू जगताप हे शेतकरी असून आई लता जगताप घरकाम करतात. शेतात ज्वारी आणि सोयाबीन पिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही ऊर्मिलाने जिद्दीने शिक्षण घेतले.
प्राथमिक शिक्षण: संत भगवान बाबा विद्यालय, नंदागोळ.
दहावीचे यश: ८६.७% गुण मिळवून कौतुकास्पद यश.
तांत्रिक शिक्षण: आयटीआय (ITI) परळी वैजनाथ येथून इलेक्ट्रिसियन ट्रेड पूर्ण केला.
लहान भाऊ आदित्य याच्या इच्छेखातर आणि स्वतःच्या जिद्दीपोटी तिने तांत्रिक क्षेत्र निवडले. आज ती पाचगणी येथील ग्रामीण टेक्निशियन म्हणून कार्यरत असून महावितरणमध्ये शासकीय सेवा बजावत आहे.
मुलींसाठी प्रेरणादायी प्रवास
एकेकाळी "बल्ब बदलण्यासाठी शिकलो नाही" असे म्हणणाऱ्यांना ऊर्मिलाने आपल्या कर्तृत्वातून उत्तर दिले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द आणि मेहनत ठेवली तर त्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, हेच ऊर्मिलाने सिद्ध केले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे.
