सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भीषण अपघात होऊन ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहा शहरातून मेढ्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त झाल्याची माहिती स्थानिक पातळीवरून मिळाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक क्रमांक केए २८ सी ५५६८ हा ट्रक महाबळेश्वरहून केळघर घाट मार्गे मेढ्याच्या दिशेने जात असताना, मुकवली माची येथील धोकादायक वळणावर रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळला.
हा अपघात अत्यंत भीषण असल्याने ट्रक चालक अदिनाथ नागरगोजे (वय ३२, रा. यवनवाडी, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. अपघातानंतर महाबळेश्वर सह्याद्री ट्रॅकर्स यांच्या मदतीने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
