Khandala Breaking l खंडणी देण्यास नकार...!चाकूने केलेल्या हल्लात तरुण जखमी : खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील प्रकार

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- -
लोणंद : निलेश काशिद
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणीखोर प्रवृत्तीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, खंडणी देण्यास नकार दिल्याने एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वाठार कॉलनी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे लोणंद- शिरवळ रस्त्यावर वीर गावाकडे जाणाऱ्या चौकात दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. पवनचक्कीच्या खांबासाठी आणलेल्या वाहनांबाबत वाद झाला असता, गहिरेश काळे (रा. हुडी – संपूर्ण पत्ता अद्याप अज्ञात) याने तेथे गाड्या लावण्यासाठी दरमहा 10 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

फिर्यादी योगेश दत्तात्रय पवार (वय 23, रा. बावडा, ता. खंडाळा) यांनी खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने खून करण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले. उपचारांनंतर फिर्यादीने दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एम. हेगडे करीत आहेत.

खंडणी मागून थेट प्राणघातक हल्ला करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
To Top