सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
भारतीय शेतीला अध्यात्म व आयुर्वेदाचा वारसा आहे. त्याचा पुरेपूर वापर करून विषमुक्त व नैसर्गिक शेती करणे काळाची गरज असल्याचे मत शेतीचे गाढे अभ्यासक राहुल टोपले यांनी व्यक्त केले.
जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प राहुल टोपले यांनी गुंफले. यावेळी ते नैसर्गिक शेती अर्थात विषमुक्त जीवन शैली व आनंद जीवन या विषयावर ते बोलत होते.
निसर्गनिर्मित जैविक साखळी माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट केली आहे. भांडवलशाही लोकांनी शेती ताब्यात घेतली आहे. त्यांच्या रासायनिक खातांचा वापर केल्याने जमिनीचा कर्ब संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतातील ७० टक्के जमिनी ह्या नापीक क्षारपड झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती करण्यासाठी कोणत्याही रासायनिक खतांची आवश्यकता नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे १०० टक्के रासायनिक शेती थांबविण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती सोपी व कमी खर्चीक आहे. पिके घेताना सकारात्मक विचाराने शेती केल्यास उत्पादन भराघोस मिळते असे टोपले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोरकरवाडी येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर बोरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळे निलख येथील "मैत्री आधार" संघाचे कार्याध्यक्ष भरत इंगवले, राजेंद्र टकले, डॉ. भरत गायकवाड, प्राचार्य पांडुरंग सुपेकर, सुभाष चांदगुडे, दीपक लोणकर, के. के. वाबळे, शरद मचाले, संतोष कोंडे, वसंतराव जाधव, कवी हनुमंत चांदगुडे, गणेश खैरे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी शेतीविषयक अनेक प्रश्न विचारले असता राहुल टोपले यांनी त्याची समर्पक उत्तरे दिली. तसेच "मिशन ऑरगॅनिक" या संस्थशी जोडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जेष्ठ सदस्य अशोक बसाळे यांनी केले. व्याख्याता परिचय संस्थेचे व्यवस्थापक गणेश भुजबळ यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------------------------
