सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील फुले- शाहू- आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्यकर्ते व साहित्यिक डॉ.रोहिदास जाधव यांची गोवा (पणजी) येथील विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.पेडणे (गोवा) येथील छत्रपती शाहू प्रतिष्ठान दरवर्षी विचार संमेलनाचे आयोजन करते.संमेलनाचे यंदा पाचवे वर्ष असून दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत करणार आहेत.
पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रागांझा हॉल मध्ये हे संमेलन संपन्न होणार आहे. डॉ.रोहिदास जाधव हे मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक असून मराठी वैचारिक लेखनाची त्यांची व्याप्ती मोठी आहे.तसेच त्यांचे संशोधनपर लेख देश, विदेशातील विविध नियतकालिकांच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहेत.सम्यक विचार विश्वव्यापी फुले शाहू आंबेडकर, आंबेडकरी राजकारण - दशा आणि दिशा,धम्ममीमांसा, मूकनायकचा आवाज,आंबेडकरी समाज चिंतन आणि चिकित्सा,उत्तम कांबळे यांचे साहित्य - एक दृष्टिक्षेप, प्रज्ञासूर्याच्या प्रकाशवाटा,सम्यक संवाद असे त्यांचे ग्रंथ प्रकाशित असून विविध स्वरुपाचे ललित लेखनही प्रकाशित आहे.त्यांनी विविध स्वरुपाच्या संमेलनांचे आयोजन करुन मराठी वैचारिक साहित्याचा परिघ व्यापक बनवला आहे.त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
