सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुळशी : प्रतिनिधी
पुण्यातील मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ स्पर्धेदरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
मुळशीतील कोळवण रोड परिसरात अरुंद रस्ता आणि अचानक वळणाचा अंदाज न आल्याने वेगात असलेले 50 हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले, ज्यात अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्पर्धेदरम्यान आघाडीवरील एका सायकलपटूचा तोल गेला. त्यामुळे मागून येणाऱ्या सायकलपटूंना थांबण्यास किंवा दिशा बदलण्यास वेळ न मिळाल्याने एकापाठोपाठ एक सायकलपटू एकमेकांवर आदळले. काही खेळाडू रस्त्याबाहेर फेकले गेले, तर काहींच्या सायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात 4 ते 5 सायकलपटूंना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले.
ही स्पर्धा 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, यात 40 देशांतील 171 आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या मार्गावर काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते, त्यामुळे वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अरुंद रस्ते, धोकादायक वळणांबाबत पूर्वसूचना, सुरक्षात्मक उपाययोजना आणि मार्ग नियोजनाबाबत योग्य काळजी घेतली होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू असून पुढील टप्प्यातील स्पर्धा अधिक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
