सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये सचिव व संचालक मंडळाकडून अपहार व कर्ज थकबाकीतील गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण व सभासदांच्या तक्रारीतून उघड झाल्यानंतर, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत थेट प्रशासक नियुक्त करण्याचा कठोर निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कर्नलवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील शरद विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. या संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्याने सहकार विभागाने थेट प्रशासक नियुक्त करण्याची कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७७ अ (ब-१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
सन १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण धनंजय के. निगडे (प्रमाणित लेखापरीक्षक, पुणे) यांनी केले. या लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे सचिव मंगेश सुभाष निगडे यांनी अपहार केल्याचे तसेच संचालक मंडळातील काही संचालकांनी कर्ज थकबाकीच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी संबंधित कार्यालयास सादर करण्यात आला होता.
दरम्यान, संस्थेचे सभासद रणजित अशोकराव निगडे यांच्यासह १०६ सभासदांनी २५ मार्च २०२५ रोजी सहकार विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सहकार विभागाने ८ सप्टेंबर २०२५ रोजी सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान सचिव व संचालक मंडळाकडून अपहार झाल्याचे तसेच कर्ज व्यवहारात गंभीर गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या समितीच्या रचनेत दोष निर्माण झाला असून व्यवस्थापनात पोकळी निर्माण झाल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले. तसेच मूळ दप्तरात खाडाखोड, कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता आणि सभासदांचे नैसर्गिक हक्क धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे मत नोंदवण्यात आले.
त्यामुळे नोटीस देणे वाजवीरित्या व्यवहार्य नसल्याची खात्री झाल्यानंतर सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर यांनी थेट प्रशासक नियुक्तीचा आदेश पारित केला. त्यानुसार, डॉ. यशवंती मेश्राम, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर यांच्या आदेशाने जयेश अनिलराव गद्रे, शाखा प्रमुख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नायगाव (राजेवाडी) यांची संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकाचा कालावधी सहा महिन्यांचा राहणार असून, या कालावधीत संस्थेचा कारभार सुरळीत करणे, आर्थिक व्यवहारांची तपासणी करणे आणि सभासदांची सर्वसाधारण सभा घेऊन पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश १ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतरीत्या निर्गमित करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पुरंदर तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई होणार का याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
