Purandar News l भाजपसोबत युती फिस्कटताच शिवसेना आक्रमक : पुरंदरमध्ये शिंदे गटाची थेट लढत, उमेदवारांची यादी जाहीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाने निवडणूक रणांगणात ठामपणे उडी घेतली आहे. भाजपसोबतची युती फिस्कटल्यानंतर कोणतीही राजकीय तडजोड न करता शिवसेनेने चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करत थेट लढतीचा निर्धार स्पष्ट केला आहे. या घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

       पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी भाजपसोबत युतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. त्यातच काही दिग्गज नेते ऐनवेळी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवत असल्याने शिवसेना शिंदे गटासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अशा कठीण काळातही शिवसेनेने मागे न हटता सक्षम व तगडे उमेदवार रिंगणात उतरवून आपली ताकद दाखवून दिली आहे. 

जिल्हा परिषद उमेदवार :
निरा–कोळविहीरे गटातून भारती अतुल म्हस्के, बेलसर–माळशिरस गटातून गणेश इंगळे, वीर–भिवडी गटातून समिर जाधव, तर दिवे–गराडे गटातून ज्योती राजाराम झेंडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

पंचायत समिती उमेदवार :
पंचायत समिती पुरंदर अंतर्गत निरा गणातून रेखा नितीन केदारी, कोळविहिरे गणातून शितल सतिश साळूंखे, माळशिरस गणातून शरद यादव, बेलसर गणातून माणिक निंबाळकर, वीर गणातून प्रविण जगताप पाटील, भिवडी गणातून सागर मोकाशी, दिवे गणातून तात्या तर, तर गराडे गणातून सुप्रिया विशाल रावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

      शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या या यादीमुळे पुरंदर तालुक्यातील निवडणूक प्रचाराला मोठा वेग मिळाला असून, इतर राजकीय पक्षांच्या हालचालींनाही चालना मिळाली आहे. आता पुरंदरमध्ये निवडणूक लढत अधिक चुरशीची आणि थेट संघर्षाची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
To Top