सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : सतीश गायकवाड
कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीत प्रेमसंबंधांच्या संशयातून एका ऊसतोड कामगाराची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासामध्ये उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे. मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या कामगाराचे नाव असून, तो जरंडेश्वर शुगर मिल्स येथे ऊसतोड व वाहतुकीचे काम करत होता. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अजय राजेंद्र माने (रा. भोसे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा मंगळवारी रात्री दहा वाजता दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र भोसले हा आपल्या पत्नी शीतल, मुलगा सुरज व मुलगी शिवानी यांच्यासह कारखाना परिसरात वास्तव्यास होता. कारखान्यातील स्लीप बॉय अजय माने याचे मच्छिंद्रची पत्नी शीतल हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मच्छिंद्रला होता. या संशयातून मच्छिंद्र व अजय माने यांच्यात वारंवार वाद, भांडणे होत होती. याच कारणावरून अजय माने याने मच्छिंद्रला अनेकदा जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी अजय माने याने मच्छिंद्रला जेवणाचे आमिष दाखवून कोपीवरून बाहेर नेले. त्यानंतर मच्छिंद्र घरी परतला नाही. रात्री उशिरा अजय माने हा एकटाच परत आला व मच्छिंद्रला गटामध्ये सोडल्याचे सांगून त्याच्या पत्नीचा मोबाईल परत दिला. मात्र मच्छिंद्रचा मोबाईल बंद लागत असल्याने संशय अधिकच बळावला. यावेळी मच्छिंद्रचा शोध घेत असताना अजय माने याने धमकीचे फोन केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
मच्छिंद्र बेपत्ता झाल्यानंतर १७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिस व नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, दि. २० जानेवारी रोजी दुपारी भोसे गावाच्या हद्दीत, धोम डावा कालव्याशेजारी असलेल्या राजेंद्र शामराव माने यांच्या ऊसाच्या शेतात एक अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले असता, कपडे व जवळ आढळलेल्या साहित्यावरून ते प्रेत मच्छिंद्र भोसले याचेच असल्याची खात्री पटली.
घटनास्थळी केलेल्या पाहणीत मच्छिंद्रच्या दोन्ही पायांना त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या पंचाने बांधलेले होते. डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने जबर मारहाण करण्यात आल्याने चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता. प्रेत सडलेल्या अवस्थेत असून परिसरात उग्र वास पसरला होता. तसेच भटकी कुत्री व इतर प्राण्यांनी प्रेताचा काही भाग खाल्ल्याचेही निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळीच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले.
तक्रारीनुसार, प्रेमसंबंधांच्या संशयातून व मच्छिंद्रकडून होणाऱ्या शिवीगाळाचा राग मनात धरून अजय माने याने मच्छिंद्रला निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर अवजड हत्याराने वार करत निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह ऊसाच्या शेतात लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेमुळे भोसे गावासह कोरेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
