Purandar News l पुरंदरमध्ये युतीचा अध्याय संपला...! भाजपची ‘स्वबळावर’ जोरदार खेळी : तगड्या उमेदवारांनी निवडणूक रणसंग्राम पेटला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय जगताप यांनी शिवसेनेसह युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर भाजप–शिवसेना युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळत स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असून, ऐनवेळी काही दिग्गजांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी सक्षम उमेदवारांची घोषणा झाल्याने पुरंदरमधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. 

       पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी सुरू असलेली भाजप–शिवसेना युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्टपणे नाकारल्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. युतीच्या नावाखाली अटी-शर्ती मान्य नसल्याने भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळत ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याची ठाम भूमिका घेतली. 

     दरम्यान, काही प्रभावी स्थानिक नेत्यांनी ऐनवेळी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या नेत्यांना तिकीट देण्यात आल्याने भाजपला ‘हत्तीचे बळ’ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फळी आणि निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन भाजपने उमेदवार निश्चित केल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे तालुक्यातील प्रत्येक गट व गणात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.
भाजपची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे – 

जिल्हा परिषद गट
▪ बेलसर – अजय इंगळे
▪ वीर-भिवडी – हरिभाऊ लोळे
▪ दिवे-गराडे – दिव्या जगदाळे
▪ निरा-कोळविहीरे – सिमा संदीप धायगुडे 

पंचायत समिती गण
▪ बेलसर – कैलास जगताप
▪ माळशिरस – माऊली यादव
▪ वीर – सुधीर धुमाळ
▪ भिवडी – अश्विनी शिंदे
▪ दिवे – सुनिल कुंजीर
▪ गराडे – ललिता कटके
▪ निरा-वाल्हे – वंदना बाळासाहेब भोसले
▪ कोळविहीरे – भाग्यवान म्हस्के 

    स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले, अनुभवी व मतदारांमध्ये पकड असलेले उमेदवार मैदानात उतरवल्याने भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. युती फिस्कटल्यामुळे आता निवडणूक थेट बहुरंगी आणि चुरशीची होणार असून, भाजपच्या या घोषणेमुळे इतर पक्षांनाही रणनीती बदलावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पुरंदरच्या राजकारणात या घडामोडींमुळे आगामी निवडणूक प्रतिष्ठेची आणि ताकदीची लढाई ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
To Top