Purandar News l निरा-कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री ?

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा पारंपरिक गड, मागील निवडणुकीत शिवसेनेने निर्विवादपणे ताब्यात घेतला होता. त्याची पुनरावृत्ती यावेळी हे होण्याच्या आशा निर्माण झाली आहे. माजी पंचायत समिती सभापती अतुल म्हस्के यांच्या पत्नी भारती अतुल म्हस्के या शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रबळ दावेदार झाल्या आहेत तर, कोळविहीरे गुळूंचे गणातून कर्नलवाडीच्या उपसरपंच स्वप्नाली विराज निगडे या प्रमुख दावेदार झाल्या आहेत. तसेच निरा वाल्हा गणातून निरेतील ताकदवान उमेदवाराची चाचपणी शिवसैनिकांकडून सुरू आहे. 

      नावळी येथील अतुल म्हस्के हे शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून गणले जातात. पुरंदरच्या पाणी प्रश्नासाठी पोलीसांच्या काठ्या व तुरुंगवास भोगलेले कणखर नेतृत्व म्हणून सुपरिचित आहे. या कष्टाचे चिज मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापतीपदी विराजमान झाल्यावर झाले होते. माजी राज्यमंत्री व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक नाव अतूल म्हस्के यांचे येते. त्यांच्या पत्नी भारती यांना जिल्हा परिषदेच्या निरा कोळविहीरे मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने उमेदवारी मागतली असुन उद्याच्या बैठकीत त्यांचे टिकिट फिक्स करण्याचा आग्रह मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिकांनी लावून धरला आहे. 

   कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेचे विराज निगडे यांनी मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेच्या सुवर्णा तानाजी महानवर यांना थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत खंबीर साथ देत, भरघोस मतांनी निवडून आणले आहे. विराज निगडे यांच्या पत्नी स्वप्नाली निगडे या सदस्य म्हणून १५० हुन अधिक मतांनी निवडून आल्या होत्या. आता या दोघी शिवसेनेच्या वतीने कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच म्हणून यशस्वीपणे गावचा कारभार चोख संभाळत आहेत. स्वप्नाली निगडे यांची वक्तृत्वावर प्रचंड मजबूत पकड असुन, महिला संघटना ही दमदार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सहकार्य, नवरात्र उत्सव साजरा करणे, महिलांच्या आरोग्यासाठी शिबिरांचे आयोजन, गावातील विविध विकासकामान मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.‌ 

      जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वाल्हे येथील सागर भुजबळ यांच्या पत्नी यांनी शिवसेनेची उमेदवारी मागितली आहे. वाल्हे हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त मतदार संख्येचे व ओबीसी मतदारांचे गाव असून, भुजबळ या निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात. 

  वाल्हे निरा पंचायत समितीचे आरक्षण एस.सी. साठी आहे. या जागेवर वाल्हेच्या रोहित भोसले यांच्या पत्नी, पिंपरे खुर्दचे विश्वजीत सोनवणे यांच्या पत्नी प्रमुख दावेदार असुन निरा शहरातील तगडा उमेदवार शिवसेनेच्या वतीने या निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची जोरदार तयारी स्थानिक शिवसैनिकांनी लावून धरली आहे. 

   कोळविहिरे गुळूंचे गणातून जवळार्जूनच्या शितल सतिश साळूंखे, साकुर्डेचे दादा थोपटे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य, दौंडजच्या सरपंच अल्का महादेव माने, राखचे अजय रणनवरे यांच्या पत्नी ही पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने इच्छूक उमेदवार आहेत. 

      या सर्व उमेदवारांना उद्या शनिवारी सासवड येथे होणाऱ्या बैठकीला बोलवले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. उद्या बैठकीत उमेदवारांच्या नावांची घोषणा वरिष्ठांकडून होणार असल्याचे ही सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या कामाला थेट सुरवात करुन प्रचारात आघाडी घेतील अशी आशा आहे
To Top