Purandar News l रणधुमाळी जिल्हा परिषद-पंचायत समितीची ! तालुक्यात चार दिवसांत ३६३ उमेदवारी अर्जांची विक्री : ३५ जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून नामनिर्देशन अर्ज विक्रीच्या पहिल्याच चार दिवसांत तब्बल ३६३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवारपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी एकूण ३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 

    पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून शुक्रवारपासून नामनिर्देशन अर्जांची विक्री सुरू आहे. आज मंगळवार अखेर चार दिवसांत एकूण ३६३ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती पुरंदर निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या चार गटांसाठी १६, तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी १९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सुरुवातीच्या चार दिवसांत अर्ज विक्रीचा आकडा पाहता, बुधवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
   
   पुरंदर तालुक्यात एकूण २३५ मतदान केंद्रे असून, पुरुष मतदारांची संख्या ९५ हजार २७१, स्त्री मतदार ९४ हजार १२९, तर इतर मतदार ३ आहेत. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ८९ हजार ४०३ इतकी आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून पंचायत समिती सदस्यासाठी ६ लाख रुपये, तर जिल्हा परिषद सदस्यासाठी ९ लाख रुपये इतकी खर्चमर्यादा आहे. 

अर्ज विक्री व दाखल करण्याबाबत दिवसभरातील तपशील असा —
शुक्रवारी पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत ८७ अर्जांची विक्री झाली.
शनिवारी दुपारी तीनपर्यंत ७३ अर्ज विक्री झाली.
सोमवारी दुपारी तीनपर्यंत केवळ १३ अर्ज विक्री झाली असून जिल्हा परिषदेसाठी १ व पंचायत समितीसाठी १ अर्ज दाखल झाला.
मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९० अर्जांची विक्री झाली असून जिल्हा परिषदेसाठी १५ व पंचायत समितीसाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत. 

     पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले असून, तहसीलदार विक्रम रजपूत त्यांना सहकार्य करत आहेत. बुधवार हा अर्ज विक्री व स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असल्याने, विविध पक्षांचे उमेदवार व इच्छुकांची धावपळ वाढल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
To Top