Rajgad Breaking l मिनल कांबळे l मढेघाट परिसरात विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला : ३५ हुन अधिक विद्यार्थी जखमी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
 पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या केळद ग्रामपंचायत (ता. राजगड) हद्दीत मढेघाट परिसरात पुण्यातील एका साहसी ट्रेकिंगचे क्लासकडून आयोजित करण्यात आलेल्या ट्रेकिंग दरम्यान विद्यार्थ्यांवर आग्या मोहोळांच्या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 35 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. बहुतांशी विद्यार्थी हे 14 ते 17 वयोगटातील आहेत. यामध्ये ट्रेकर प्रशिक्षकांचा सुद्धा सहभाग आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिकांनी केलेल्या बचाव कार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर घटना रविवार (ता.०४) रोजी सुमारे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मढेघाट परिसरात पुण्यातील साहसी ट्रेकिंग करणाऱ्या एका क्लासच्या माध्यमातून आयोजित ट्रेक मध्ये सुमारे पन्नास हून अधिक विद्यार्थी घेऊन प्रशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक यांनी मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करत असताना मढे घाट उतरल्यानंतर मध्यभागी गेल्यावर गर्द झाडीमध्ये झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्याने विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.

मोठ्या प्रमाणात मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने विद्यार्थी सैरभर झाली यामध्ये आठ ते दहा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जखमी झाले तर इतर 25 विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात मधमाशांनी चावा घेतला. दरम्यान ट्रेक मध्ये असलेल्या एक जणांनी तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांच्याशी संपर्क साधला यानंतर भेके, व या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी असलेले सूर्यकांत शिंदे यांनी परिसरातील असलेल्या सोशल मीडियाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर घटनेची माहिती पाठवली.

घटनेची गांभीर्य ओळखून केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे, सुरेश शिंदे, अंकुश शिंदे, शिवाजी धुमाळ, दिलीप शिंदे, कैलास शिंदे, भरत शिंदे तसेच निगडे खुर्द चे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भावळेकर, यांनी घटनास्थळी धाव घेत.

कड्यामध्ये असलेल्या मुलांना वरती काढले दरम्यान परिसरातील वाहन चालक दीपक भुरक, मोहन खुळे, महेश गुजर, यांनी स्वतःच्या वाहनांमधून व 108 क्रमांकाच्या रुग्णवाहितीतून या विद्यार्थ्यांना व प्रशिक्षकांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
विद्यार्थ्यांना मळमळने, उलटी होणे, चक्कर येणे, तसेच चेहऱ्यावर, डोळ्यावर, ओठावर सूज येणे आणि आणि दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना अशी लक्षणे होती. या रुग्णांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर हिरास व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचार केले. यानंतर अधिक जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुणे येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी पाठवण्यात आले. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.
To Top