Satara Breaking l कृषी विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाची छापेमारी, बनावट रासायनिक खत आणि कीटकनाशके जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
सातारा येथे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छाप्यात बनावट खते, किडनाशकांचा कारखाना शनिवारी उघडकीस आला. या कारवाईमध्ये तीस लाख रुपयांहून अधिक किमतीचे बनावट रासायनिक खत आणि कीटकनाशके जप्त केली आहेत. याप्रकरणी प्रतिक काळे (वडूज ता खटाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री पवार (फरांदे) यांनी दिली.

प्रतीक काळे हा बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके तयार करत होता. तो राज्यभरातील कृषी विक्रेत्यांना ही खते आणि कीटकनाशके विक्रीसाठी देत होता. या पुरवठ्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याप्रमाणे कृषी विभागाने सोलापूर, सातारा, सांगली, पुणे येथे विक्रेत्यांच्या दुकानावर छापा टाकून बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके जप्त करत विक्रेत्यांवर गुन्हेही दाखल केले होते.

मात्र या कारखानदारापर्यंत कृषी विभागाला पोहोचता येत नव्हते. दर पंधरा दिवस ते एक महिन्याने तो आपले गोडाऊन बदलत होता. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. त्यामुळे शिराळा (जि. सांगली) येथील एका कृषी विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी याने तयार केलेली बनावट खते आणि कीटकनाशके आढळून आली होती. त्यानंतर त्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या विक्रेत्याच्या माध्यमातून प्रतिक काळे याच्या गोदामापर्यंत पोहोचता आले. सातारा जिल्हा कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा
टाकून तीस लाख रुपयाचा मद्देमाल जप्त केला आहे

हा कारखानदार बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके आणून नामांकित कंपन्यांच्या पिशव्या तयार करून त्याद्वारे विकत होता. तो अशी बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके कुठून आणत होता कोठून आणत होता याची माहिती पोलीस आणि कृषी विभाग घेत आहेत. त्याच्याकडून अनुदानित रासायनिक खते ती तयार करण्यासाठीचा कच्चामाल त्याच्या बोगस पिशव्या बनावट रासायनिक कीटकनाशके त्याच्या छापील पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जिल्हास्तरीय भरारी पथक मधील कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सातारा गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सातारा संजय फडतरे, कृषी अधिकारी गुण नियंत्रण खटाव, के के राऊत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहित फरणे हे सहभागी झाले. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पुढील तपास करीत आहे.

हा कारखानदार बनावट रासायनिक खते आणि कीटकनाशके आणून अनुदानित व विनाअनुदानित नामांकित कंपन्यांच्या बोगस छापील पिशव्याद्वारे गावोगावच्या विक्रेताला विकत होता. त्याच्याबाबत कृषी विभागाला माहिती मिळाली होती. मागील अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेतला जात होता. परंतु तो मिळून येत नव्हता. शेतकऱ्यांनी कुठेही बोगस रासायनिक खते आणि कीटकनाशके आढळून आल्यास कृषी विभागाला कळवावे असे आवाहन साताऱ्याचे जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री पवार - फरांदे यांनी केले आहे.
To Top