Satara News l घरात बाळाच्या आगमनाची तयारी...! बाहेर अपघाताची बातमी : जवान प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा रस्ता (Accident) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुट्टीवर गावी आले असताना हा अपघात घडला. विशेष म्हणजे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते गावी आले होते. एकीकडे त्यांच्या पत्नीने बाळाला जन्म दिला, तर दुसरीकडे प्रमोद जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
              काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे पत्नीच्या प्रसूतीदरम्यान तिच्यासोबत राहण्यासाठी त्यांनी आठ दिवसांची रजा घेऊन गावी येण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू होती. शनिवारी काही कामानिमित्त प्रमोद जाधव हे आपल्या दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दरे गावात शोककळा पसरली.

हृदयद्रावक बाब म्हणजे, शनिवारी सकाळी प्रमोद जाधव यांचे पार्थिव गावात आणले जात असतानाच त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात पाळणा हालणार या आनंदात असतानाच घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले. जन्माच्या काही तासांतच त्या चिमुकलीवर वडिलांचे छत्र हरपले.
शनिवारी दुपारी दरे गावात प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यदर्शनावेळी पत्नी आणि नवजात बालिकेला पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.
To Top