सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळावे आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात ‘कृषी मित्र’ नियुक्त करण्याची नवी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली.
भरणे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी तांत्रिक सल्ला आणि सरकारी योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. याआधीच राज्यात ११,५८७ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, आता ‘आत्मा’ योजनेअंतर्गत ‘कृषी मित्र’ किंवा ‘शेतकरी मित्र’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने प्रत्येक गावात किमान एक कृषी मित्र नियुक्त करण्याचे धोरण आखले आहे. या पदासाठी अनुभवी, प्रयोगशील आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. नियुक्त कृषी मित्र संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसोबत काम करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे योजनांची माहिती आणि तांत्रिक मदत अधिक जलद गतीने उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी मित्रांना वर्षाला १८ हजार रुपये मानधन दिले जाणार असून ते दर तीन महिन्यांनी वितरित केले जाईल. ही योजना १ जूनपासून सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
कृषी मित्र पदासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असावे, संवाद कौशल्य चांगले असावे तसेच समाजकार्याची आवड असावी. सोशल मीडियाचा वापर करता येणे आवश्यक असून किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या योजनेत ३० टक्के महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ११,५८७ कृषी मित्रांची नियुक्ती करण्यात येणार असून ही प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक सुलभ होईल, तर ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
